प्रतिनिधी / कुर्डुवाडी
भोसरे ता. माढा येथील बागल वस्तीतील पाच घरांवर आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करुन लूटमार केली. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. दत्तात्रय बागल असे या जखमीचे नाव आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी नेमका कितीचा मुद्देमाल लंपास केला याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास बागल वस्तीतील घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी काही नागरिकांवर त्यांनी हल्ला देखील केला. यात दत्तात्रय बागल हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली असून श्वानपथकांना पाचारण करण्यात आले आहे. याबाबत कुर्डुवाडी पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. सदर घटनेची नोंद घेण्याचे काम पोलिसांत सुरु आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
भोसरे येथील दरोडा पडलेल्या संबधीत घरांना मी भेट दिली आहे. स्थानिक पोलिसांची विविध पथके तयार केली असून ती लवकरच संशियतापर्यत पोहचतील. मात्र सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. – तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर