- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले निवेदन
- दोषींवर कडक कारवाई करा, अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन
सोलापूर/ तरुण भारत संवाद प्रतिनिधी:
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुन्ना बज्जर या वाहनचालक महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्या प्रकरणी आज बुधवारी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाई करा, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन करु असा इशाराही निवेदनात दिला.
निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवारी पंढरपूर येथील मुलाणी हे शेतकरी त्यांनी दिलेल्या अवैध सावकारी बंद करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी दिलेल्या संबंधित कार्यकारी करावी होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होते. शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास परावृत्त करण्याचे प्रयत्न वाहनचालक कंत्राटी कर्मचारी हे करीत असताना प्रहार संघटनेच्या वतीने अरेरावी करून मारहाण करण्यात आलेली आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करीत काळ्या फिती लावून निदर्शने करून आज आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तात्काळ आरोपींवर कडक कारवाई करून अटक करावी, अन्यथा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनाला दिला आहे.
दोषींवर कारवाई व्हावी
पंढरपुरातील शेतकऱ्याची आत्महत्या करण्यास परावृत्त करीत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. अशी घटना कोणत्याही कर्मचाऱ्या समवेत घटना घडू नये. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
मुन्ना बज्जर, महसुल कर्मचारी