पहिल्या महिला महापौर शेवंताबाई पवार यांनी सोडविले सर्वसामान्यांचे प्रश्न
सोलापूर / परशुराम कोकणे
सोलापूर महापालिकेत महापौर पद महिलांसाठी आरक्षित झाले. काँग्रेस पक्षाच्यावतीने सक्षम महिलेचा शोध सुरु झाला आणि पुढे आले सर्वसामान्य कुटूंबातील शेवंताबाई पवार यांचे नाव. शिक्षण कमी असलेले तरी अनुभवाच्या जोरावर अल्पावधीत यशस्वी झालेल्या शेवंताबाई पवार यांनी महापौर पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर प्रशासनावर पकड कामय ठेवली. महापालिकेची सर्वसाधारण सभा असो वा शहारातील विविध प्रश्नांवर बैठक किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो या सर्व प्रश्नांवर त्यांनी पोटतिडकीने आपले विचार मांडले. महापालिकेतील पहिली रणरागिनी म्हणून शेवंताबाई पवार यांच्याकडे पाहिले जात होते. सोलापूर महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याची संधी बंजारा समाजातील कार्यकर्त्या शेवंताबाई पवार यांना मिळाली होती. 6 मार्च 1997 ते 20 मार्च 1998 या कालावधीत त्या महापौर होत्या. सातवी उत्तीर्ण असलेल्या शेवंताबाई पवार यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले होते.
शेवंताबाई पवार या मूळच्या कलघटगी (जि. हुबळी, कर्नाटक) येथील. गदग हे त्यांचे सासर. त्यांचे पती सोमसिंग पवार हे सोलापुरात शिरस्तेदार होते. 1975 पासून शेवंताबाई पवार या सोलापुरात काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या. त्या 1997 साली पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, बंजारा समाजाचे नेते चंद्राम गुरुजी चव्हाण, ज्येष्ठ नेते विष्णूपंत कोठे यांच्यामुळे शेवंताबाई पवार यांना महापौर होण्याची संधी मिळाली.
राजकारणात असूनही त्या समाजकार्याला प्राधान्य देत होत्या. बहुरुपी समाज बांधवांना घरे बांधून दिली. नंदीवाल्यांचेही प्रश्न सोडविले. सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी त्या प्रयत्नशील होत्या. शिक्षण कमी असले तरी महापौर म्हणून त्या कोठेही मागे पडल्या नाहीत.
घरी त्या बंजारा समाजाची गोरमाटी भाषा बोलायच्या. शेवंताबाई पवार यांना 4 मुली, 1 मुलगा असा परिवार. त्यांनी सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले. मुलगी भारती भीमराव जाधव या गृहिणी आहेत. शैलेजा नामदेव चव्हाण या मनोरमा बँकेत कामाला आहेत. तेजस्वीनी विजयकुमार राठोड या शिक्षीका होत्या. त्यांनी निवृत्ती घेतली आहे. हेमलता प्रकाश राठोड या न्यायाधीश होत्या. अपतात त्यांचा मृत्यू झाला. मुलाचेही निधन झाले आहे. माजी महापौर शेवंताबाई पवार यांची मुलगी तेजस्वीनी राठोड या काही काळ राजकारणात होत्या. शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूकही त्यांनी लढविली, पण त्यांना यश आले नाही. पवार कुटूंबातील कोणीही सध्या राजकारणात नाही.
महापालिकेत महिला महापौरांची परंपरा
वयाच्या 73 व्या वर्षी 12 डिसेंबर 2012 रोजी शेवंताबाई पवार यांचे निधन झाले. शेवंताबाई पवार यांच्यानंतर 2002 साली नलीनी चंदेले, 2007 साली अरुणा वाकसे, 2012 साली अलका राठोड, 2014 साली प्रा. सुशीला आबुटे, 2017 साली शोभा बनशेट्टी, 2019 मध्ये विद्यमान महापौर श्रीकांचना यन्नम यांना महापौर होण्याची संधी मिळाली आहे.