राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महाविकास आघाडीच्या काळात महिला अत्याचार झाल्याचे दिसत असले तरी यातील 47 पैकी 32 बलात्काराच्या घटना या फडणवीसांच्या काळात घडल्या आहेत. ज्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. निवडणुकीच्या काळात भाजपने 66 महिला अत्याचारातील लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते काय अत्याचार कमी करणार आहेत, आम्हीच महिला सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर काम करणार आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात दिशा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या शनिवारी सोलापूर दौर्यावर होत्या. यावेळी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीच्या महिला निरीक्षक दिपाली पांढरे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सुनिता रोटे, कार्याध्यक्ष संतोष पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, राज्यात अत्याचार होत आहे, मुंबई पोलिसांना बदनाम करावयाचे आहे, यासाठी भाजपने 80 हजार फेक अकाउंट तयार केले. परंतु गृहमंत्रालयाने चांगली जबाबदारी पार पाडली आहे. आम्ही देखील जनता व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला सुरक्षेचा प्रश्न सोडवणार आहे. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेउन तक्रार पेटी, बिट मार्शल, महिला कमिटीबाबत चर्चा केली आहे. तसेच सोलापूर महापालिकेच्या वर्षभरात नगरसेवकांच्या निवडणूका येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरातील 50 टक्के बूथ कमिटीचे काम झाले असल्याचे प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी सांगितले.