कोठे यांच्या कार्यकर्त्यांचा तर शेख यांच्या मुलाचाच होणार प्रवेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शिवसेनेचे महेश कोठे गटातील कार्यकर्त्यांचा व तौफिक शेख यांच्याऐवजी त्यांचा मुलगा व इतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली. कोठे आणि शेख यांचा प्रवेश मात्र लांबणीवर पडला आहे.
आगामी विधान परिषद, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलपुरात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी (ता. 17) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात माजी आमदार दिलीप माने, शिवसेना नगरसेवक महेश कोठे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. मात्र काही कारणास्तव झाला नाही. दरम्यान, कित्येक महिन्यांपासून दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश झाला नाही. आगामी महापालिका, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात बदल होण्याची शक्मयता आहे. कित्येक महिन्यांपासून शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र दोन्ही वेळी त्यांची संधी हुकली. प्रवेशासाठी ते अद्यापही धडपड करीत आहेत, तर दुसरीकडे ऑल इंडिया मजलिस-ए -इत्तेहादुल मुस्लिमीनचे नगरसेवक तौफिक शेखसह पाच नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी दौऱ्यावर शेख आता राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात व नेतेमंडळी आल्यानंतर भेटीस येत आहेत. शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते महेश कोठे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला पुन्हा एकदा थांबवण्यात आले असून एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचा मुलगा व कार्यकर्ते, कोठे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी जाहीर प्रवेश होणार असल्याचे साठे यांनी सांगितले. |