तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ सप्टेंबर पासून, मंगळवार ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांनी व्यापक प्रमाणात करावी. मोहिमेत लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.
कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीबाबत आज जिल्हाधिकारी श्री.शंभरकर यांनी बैठक घेतली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, सोलापूर महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, डॉ. अविनाश घोरपडे आदी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून कोविड विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याबाबत काटेकोर नियोजन करा. मोहिमेत लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी होतील, याकडेही लक्ष द्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.