प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आणखी २२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून तालुक्यात आता बाधित रुग्णांची संख्या १७५ वर पोहचली आहे.माढा तालुका आता द्विशतकाच्या वाटेवर आहे.
माढा तालुक्यातील रिधोरेसह पापनसमध्येही कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. आज पापनस येथे एकूण १४ बाधित रुग्ण तर रिधोरे येथे ३ तर लऊळ व मोडनिंब येथे प्रत्येकी २ तर माढा येथे १ असे एकूण तालुक्यात २२ बाधित रुग्ण असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तालुका आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. माढा आता द्विशतकाच्या वाटेवर असून नागरिकांनी आता खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना आपली ही काही जबाबदारी आहे. बाधित रुग्णानेही खरोखर माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. माहिती लपवून ठेवल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. तरी आपला संपर्क व माहिती प्रशासनाला द्यावी जेणेकरून वेळीच याला अटकाव घालता येईल.