तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज नव्याने एकूण १८ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील बाधितांचा आकडा २४८ वर पोहचला आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आजपर्यंत ७९ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
आज कुर्डुवाडी येथील रेल्वेवसाहतीमधील देवकते वस्तीमध्ये एक व्यक्ती सोलापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी गेला असता तेथे तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर माढा, रांझणी, कुर्डू, पापनस, खैराव येथे पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची रॅपीड टेस्ट घेतली असता माढा येथे ९, रांझणी येथे १, कुर्डू येथे १, पापनस येथे ५ तर खैराव येथे १ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे तसेच खैराव व उपळाई येथील पुरुषाचा तर मोडनिंब येथील एका महिलेचा अशा एकूण तिघांचा मृत्यू झाला असल्याचेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.