तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा सबजेल मधून पळालेल्या चार आरोपींपैकी आणखी एक आरोपी कुर्डुवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून आतापर्यंत दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्याप दोन आरोपी फरार आहेत. तानाजी नागनाथ लोकरे रा. लऊळ ता. माढा असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दि.१९ रोजी सकाळी ८ वा. सुमारास माढा सबजेलमधून अकबर सिद्धाप्पा पवार या आरोपीस फिट आल्याचा बनाव करुन सिद्धेश्वर शिवाजी केचे रा. दारफळ ता. माढा, आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर रा. डिडुळगाव जि. पुणे, तानाजी नागनाथ लोकरे रा. लऊळ ता. माढा, अकबर सिद्धाप्पा पवार रा. कुर्डू ता. माढा या चौघा आरोपींनी कर्तव्यास असणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की करुन जेलमधून पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला असता यातील एक आरोपी आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर हा कालच निमगांव मा. येथे माढा पोलिसांच्या हाती लागला.
आज कुर्डुवाडी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील पोक्सोखालील आरोपी तानाजी नागनाथ लोकरे (रा.लऊळ) कुर्डुवाडी रेल्वेस्थानकात कोणत्यातरी रेल्वेने पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी चिमणाजी केंद्र व त्याचे सहकारी पो. कॉ. नितीन गोर, दत्ता सोमवाड, सिद्धनाथ वल्टे यांनी सापळा रचून त्याला कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात सकाळी ९ वा. सुमारास त्याला पकडले.