तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. या बाधित रुग्णांवार कुर्डुवाडी येथील संकेत कोविड केअर, रामानंद कोविड केअर सेंटर वर उपचार केले जात आहेत.परंतू वाढती रुग्ण संख्या पहाता हे सेंटर देखील कमी पडत असल्यामुळे लक्षणे नसलेल्या नागरिकांना सोलापूर,पंढरपुर शहराप्रमाणे त्यांच्या राहत्या घरी त्यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना परवानगी द्यावी असे येथील नागरिकांची मागणी आहे.
एखादा कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यास त्याला काही प्राथमिक लक्षणॆ असल्यास त्याच्यावर व पॉझिटीव्ह असूनही कोणतेही लक्षणे नाहीत त्यालाही येथील कोविड केअर सेंटरवर दाखल करून उपचार केले जातात. परंतू या ठिकाणी असणारी अपुरी व्यवस्था प्रसाधन गृहांची संख्या अगदी मोजकीच. आणि एकाच प्रसाधन गृहाचा वापर अनेकांना करावा लागतो. त्यामुळे नको ते संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ज्याला शक्य असेल त्याला कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ज्याच्या घरी सर्व स्वतंत्र व्यवस्था आहे. त्याला घरीच उपचार घेण्याची परवानगी द्यावी. व ज्याची व्यवस्था नाही मात्र पैसे भरून स्वतंत्र राहण्याची तयारी आहे त्यासाठी लॉज अधिग्रहण करून पेड कोविड सेंटर्स चालू करावेत अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नागरिकांनी त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असून या काळात कोणीही आपली रुम सोडून घरात इतरत्र किंवा बाहेर फिरता कामा नये. असे आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच शेजारी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनीही अशा घरी उपचार घेणाऱ्या लोकांबाबत भिती बाळगू नये. आपल्या सर्वांना मिळून या कोरोनावर मात करायची आहे. आज वेळ त्यांची आहे उद्या आपलीही येऊ शकते. यासाठी सर्वांनी सारासार विचार करून समाजात वावरताना योग्य ती भूमिका घेणे आवश्यक आहे. विनाकारण एखाद्या गोष्टीचा बाऊ करु नये. स्वतः सुरक्षित राहून इतरांनाही यातून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या दि २/७/२०२० च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थानिक प्रशासनाने कोरोना बाधित पण ज्यांना कोणतेही लक्षण नाहीत अश्या रुग्णांकडून शपथपत्र भरून घरातच विलगीकरणात ठेवणे गरजेचे आहे , ज्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही. जे आर्थिक दृष्टया सक्षम आहेत ते कोविड् केअर सेंटर मध्ये न जाता कोविड् हॉस्पिटलमध्ये दाखल करा म्हणून खाजगी डॉक्टरांच्या मागे लागतात त्यामुळे गरजू अत्यवस्थ बाधित पेशंटना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहत नाहीत त्यामुळे अश्या रुग्णांसाठी पेड कोविड सेंटर लॉज अधिग्रहण करून सुरू करावे . – डॉ संतोष कुलकर्णी, अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य गर्भलिंनिदान प्रतिबंध कमिटी IMA महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सदस्य IMA इंडिया