तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
नुकतीच आयपीएल २०२१ला सुरुवात झाली आहे. दरवर्षी आयपीएल सुरु होताच प्रत्येकजण आपल्या आवडत्या आयपीएल टीमला वेगवेगळ्या पध्दतीने पाठिंबा दर्शवत असतो. आपल्या आवडत्या टीमचे स्टेटस ठेवणे, त्या टीमची जर्सी तयार करुन घेणे, काहीजण तर चक्क हेअर कट मधूनही आपल्या टीमवरील प्रेम दाखवत असतात आणि सोलापूरमध्येही असचं मुंबई इंडियन्सच्या एका फॅनने अनोख्या पध्दतीने टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील स्पर्श रंगकला परिवारातील युवा चित्रकार विपुल मिरजकर याने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला शुभेच्छा देण्यासाठी ४×५ फुटाची आकर्षक पोर्ट्रेट रांगोळी काढलेली आहे.
स्पर्शरंग कलापरिवारचा विपुल मिरजकर व त्यांची टीम विविध उपक्रम राबवित असतात. यापूर्वीही त्यांनी दुर्गा देवीची प्रतिमा साकारली होती. दरम्यान यंदा होणाऱ्या आयपीएल २०२१साठी त्यांना मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माची पोर्ट्रेट रांगोळी काढत आपल्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोनामुळे प्रत्येकाला सर्वांना घरीच राहून आनंद लुटवा लागणार आहे. विपुलने साकारलेली ही रांगोली मुंबई इंडियन्सच्या फॅन्सच मन नक्कीच आकर्षित करेल यात काही शंकाच नाही. ही रांगोळी पुर्ण करायला विपुलला दोन दिवसांचा कालावधी लागला आहे.