प्रतिनिधी / सोलापूर
टाळेबंदीमुळे व कोरोनाच्या भीतीमुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली लालपरीची बससेवा 8 जून सोमवार पासून जिल्हांतर्गत सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या प्रतिसादा अभावी सोलापूर आगारातून 7 बसच्या माध्यमातून दिवसभराच्या 14 फेऱ्यातून अवघे 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगारप्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली.
राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च पासून एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारकडून तब्बल चार वेळा टाळेबंदी मध्ये वाढ करण्यात आली. मात्र टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात 8 जून पासून अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये एसटीची सेवा जिल्हांतर्गत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून टाळेबंदी वाढविण्यात आल्याने एसटीच्या सेवेवर प्रश्न निर्माण झाला होता. तर प्रवाशांचे एसटी केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान सरकारकडून अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर व्यवसायांची दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र यानंतर जिल्हाअंतर्गत एसटी बस, खाजगी बस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर आजारातूनआगारातून जिल्हांतर्गत वाहतुकीस हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी सोलापूर आगारातून अक्कलकोट पंढरपूर खानापूर वडापूर बार्शी तिऱ्हे मार्गे पंढरपूर आशा 14 फेऱ्यातून अवघे 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून एका बसमध्ये 22 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट होण्याबरोबरच एसटी तोट्यात चालणार असल्याचे आगारप्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांनी सांगितले.