प्रतिनिधी / बार्शी
छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या विटंबने बाबत व बार्शी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार राजेंद्र राऊत यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारून ठार करण्याच्या देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ बुधवार दि.10 मार्च 2021 रोजी संपूर्ण बार्शी शहर व बार्शी तालुका स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला. यावेळी गर्दीने फुललेले बार्शीतील रस्ते सुनसान दिसत होते, तर बार्शीकर यांनी शंभर टक्के बंद पाळून दोन्ही घटनेचा निषेध आज व्यक्त केलेला पाहायला मिळाला.
येथील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर चालवीत असलेल्या राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र वरती बार्शी नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी या अन्नछत्रा वरती हल्ला केला होता. त्यावेळी वस्तूंची नासधूस करण्यात आली होती. याप्रकरणी बार्शी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर अमोल चव्हाण यांना अटक झाली व जामीनही मंजूर झालेला आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली असा आरोप भाऊसाहेब आंधळकर यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले. राऊत व आंधळकर या दोघांमध्ये आरोपांचे व एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.
हा गोंधळ चालू असतानाच मुंबई येथील नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे धमकी प्रकरण अगदी विधानसभेपर्यंत गाजले विधानसभा सभागृहामध्ये माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उचलून धरल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली याची दखल घेत पनवेल पोलिसांनी नंदू पाटील ऊर्फ मुंबई बाबा यास समज देऊन सोडण्यात आलेले आहे. तरी आज छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या फोटो आणि पुतळे यासंदर्भात झालेले विटंबनेचा निषेध व बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना देण्यात आलेल्या धमकीचा निषेध म्हणून बार्शीतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
या बंद मध्ये व्यापारी महासंघ, दि बार्शी मर्चंट असोसिएशन कापड बाजार असोसिएशन, किराणा बाजार असोसिएशन, सराफ असोसिएशन, स्टेशनरी व जनरल असोसिएशन, पान मसाला असोसिएशन, भांडी बाजार असोसिएशन, होटेल असोसिएशन, कॅटल फुड असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, डाळ मिल असोसिएशन, हमाल तोलार संघटना, मेडिकल असोसिएशन, सिमेंट असोसिएशन, खते व बी-बियाणे असोसिएशन, बार्शी इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन, इत्यादी संघटनांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, त्याचप्रमाणे सर्व व्यापारी असोसिएशन, सकल मराठा समाज बार्शी तालुका, शिवप्रेमी संघटना, शिवभक्त मावळ्यांनी महापुरुषांच्या विटंबनेबाबतच्या निषेधार्थ कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बार्शी शहर व तालुका बंदमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
आज बार्शी बंद शांतते मध्ये पाळण्यात आला असला तरी पोलिसांनी मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणी गंभीर लक्ष घातलेले पाहायला मिळाले. बार्शी शहर व तालुका पोलिस व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून पोलिसांची कुमक मागून चोख बंदोबस्त ठेवला होता. यासाठी बार्शी पोलिसांनी अतिरिक्त दोन पोलिस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक , दहा पोलीस उपनिरीक्षक व शंभरच्या आसपास पोलीस कर्मचारी व दंगल काबू पथक असे अनेक पथके बार्शीत नेमून चोख बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळाला.विटंबना निषेध व आमदार राऊत धमकी प्रकरणी बार्शी आज कडकडीत बंद