तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जूनच्या पहिल्या दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. दिवसभर उकाडा जाणवत होता. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला होता. अखेर बुधवार आणि गुरुवारी सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकर अन बळीराजाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात बुधवारी 13.93 मी.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस बार्शीत 29.10 , सर्वात कमी सांगोला तालुक्यात 1 मी.मी इतका पाऊस झाला आहे. दोन दिवस पाऊस झाल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
मार्च ,एप्रिल , मे या तीन महिन्यात सोलापूर जिल्ह्यात तापमान उच्चांक गाठले होते. उन्हाचा पारा 45 अंशाच्या पुढे गेला होता. कोरोनाच्या संकटाबरोबर वाढत्या तापमानामुळे सोलापूरकरांची अंगाची लाही लाही झाली होती. जून महिना उजाडला आणि सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. तालुक्यासह, शहरात ही पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र त्या नंतर मृग नक्षत्राच्या पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला होता. दिवसभर उकाडा जाणवत होता त्यामुळे सोलापूर कधीही वैतागले होते. अखेर बुधवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारीही दुपारी बाराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी सह सोलापूरकर सुखावला आहे. उत्तर सोलापूर, माढा , अक्कलकोट पंढरपूर , दक्षिण सोलापूर, बार्शी, माळशिरस, सांगोला, मोहोळ , मंगळवेढा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच शहरातील प्रमुख चौकात चौकात रस्त्यावर पाणी साचले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी घरांची पत्रे उडून गेली आहेत. तर काही शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला
महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोलापुर विभागीय संशोधन केंद्राच्या वतीने दि. 10 जून बुधवारी सोलापूर शहर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरला असून बुधवारी सायंकाळच्या सुमारास शहर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर गुरुवारी दुपारी च्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांना दिलासा
बुधवार आणि गुरुवारी शहर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला दिलासा देणारी बाब आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद पिकाची पेरणी केली आहे. त्या पिकाला मोठा फायदा मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
तालुका झालेला पाऊस
उत्तर सोलापूर। 26.94
दक्षिण सोलापूर 14.57
बार्शी। 29.10
अक्कलकोट। 11.22
मोहोळ। 24.50
माढा 15.97
करमाळा 12.00
पंढरपूर। 12.20
सांगोला 1.00
माळशिरस 2.90
मंगळवेढा 7.86
एकूण 14.39, सरासरी- 13.93