मनसे नेते बाळा नांदगावकर यांची टीका, ईडीची नोटीस आल्यास चौकशीला सामोरे जावेच लागेल
सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
शिवसेनेचे नेते अनिल परब हे ज्या मुशीत वाढले आहेत त्याच मुशीत मी पण वाढलो आहे, त्यांची कुंडली मला माहिती आहे आणि माझी कुंडली त्यांना माहिती. मला जर सुपारीवाले म्हणत असतील तर ते हप्तेखोर आहेत, केबलवाल्यांना जाऊन विचारा मग कळेल कोण हफ्ते खोर आहेत, अशी टीका मनसेचे नेते तथा माजी मंत्री बाळा नांदगावकर यांनी सोलापुरात केली.
विज बिल माफी संदर्भात व मायक्रोफायनान्सचे कर्ज माफी संदर्भात सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्यावतीने माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महामोर्चानंतर पत्रकारांशी बोलत होते.
नांदगावकर म्हणाले, ईडी प्रकरणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरद पवारांनाही नोटीस आली होती. त्यांनाही सामोरे जावेच लागले. त्यामुळे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनाही ईडीच्या नोटीसला सामोरे जावे लागेल. सरनाईक हे माझे चांगले मित्र असून लवकरच ते निर्दोष बाहेर पडतील.
पदवीधरांच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी ते म्हणाले, अशा गोष्टींना मी महत्त्व देत नाही आणि ते देणे योग्य नाही. अशा खूप प्रसंगात आम्ही गेलेलो असून असे खूप फोन येतात यांना आम्ही किंमत दिली नाही. पाटील हे प्रचाराचे काम करीत आहेत.
खा. संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये
मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असला पाहीजे व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी असो पुढे असलाच पाहिजे. संजय राऊत यांच्या भूमिकेशी सहमत असन्याचे कारण नाही. दोन्ही पक्षाची भूमिका वेगळी आहे.संजय राऊत यांनी मराठी मुद्द्यावर आम्हाला शिकवू नये.