दिराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील काझीकणबस येथे शेतीच्या बांध बंधाऱ्याच्या वादातून महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारून मृतदेह तलावात टाकल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत संगीता सिद्धाराम देशेट्टी वय ४५ असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना दि ६ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काझीकणबस या गावात मयत महिला व दिर शांतप्पा बसवणप्पा देशेट्टी यांची शेतजमीन असून सामायिक बांध शांतप्पा हे सतत अतिक्रमण करत होते. मागील दहा महिन्यांपूर्वी याच विषयावरून भांडण ही झाले होते. आणि त्याच वेळी दिर शांतप्पा हे मयत संगीता यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. दि ५ ऑगस्ट रोजी फिर्यादी खंडेशा सिद्धाराम देशेट्टी वय २१ हे नेहमीप्रमाणे दिवसभर म्हशी चारून सायंकाळी घरी आल्यानंतर सावत्र आई मयत संगीता ह्या घरात दिसल्या नाहीत. वडील सिद्धराम यांना विचारले असते आई संगीता दुपारी तीन वाजता बाजरी कापण्यासाठी शेतात गेली आहे. असे समजले. पण शेतातून घरी परत न आल्याने फिर्यादी मुलगा खंडेशा यांनी आपल्या आईचा सर्वत्र शोध घेतला पण सापडून आली नाही.
दुसऱ्या दिवशी दि ६ रोजी सकाळी आईला शोधत असताना मुलगा खंडेशाला शेताजवळील तलावाच्या पाण्यात एक महिला पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले त्यामुळे घाबरून मुलगा खंडेशा आपल्या चुलत भावाला व मोठे चुलते यांना सोबत घेऊन खात्री केली असता मयत संगीता सिद्धाराम देशेट्टी आढळून आले. पाण्यातून प्रेत बाहेर काढले असता मयत संगीताच्या गळ्यावर, मानेवर उजव्या हाताच्या दंडावर धारदार हत्याराने मोठ्या जखमा दिसल्याने आईचा खून करून पाण्यात प्रेत टाकल्याचा संशय आला. ही हत्या फिर्यादीचे चुलते संशयित शांतप्पा बसवणप्पा देशेट्टी यांनी केली आहे. असे फिर्यादी खंडेशा सिद्धाराम देशेट्टी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपी शांतप्पा देशेट्टी याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.