वित्त विभाग अवर सचिव माधवी गांधी, मात्र आदेशामध्ये कोविडचा उल्लेख नाही
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
आयुक्तांच्या मागणीनुसार कोविडच्या कामासाठी नगरविकास व वित्त विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार वित्त विभागाने लेखा विभागात कार्यरत धनराज पांडे यांची सोलापूर महानगरपालिकेत प्रशासकीय उपायुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली असल्याचे वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी ‘तरूण भारत संवाद’ला शुक्रवारी सांगितले.
महापालिकेतील उपायुक्त हे प्रशासकीय पद आहे. या पदावर तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची प्रशासकिय सेवेतील पदावर बदलीने प्रतिनियुक्तीने नेमणूक करता येणार नाही, असा 4 मे 2006 रोजीचा शासन निर्णय (संकीर्ण-1005/वर्गीकरण/प्र.क्र.379/05/नवि-24) आहे. परंतु शासनाच्या निर्णयाला डावलून वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी 29 जुलै 2020 रोजी सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षक धनराज वा. पांडे यांची नियुक्ती सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त या प्रशासकीय पदी केली आहे. परंतु नियुक्ती आदेशामध्ये ज्या कोविड कामासाठी मागणी केली होती. त्याचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता नाही
-नगरविकास खात्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता नाही. परंतु काही लोक अर्ज देतात. त्याप्रमाणे आपल्याकडून मागणी पत्र गेले असेल. दोन्ही विभागाच्या मान्यतेने दुसऱ्यांना डेप्युटेशनवर नियुक्ती देऊ शकतो.
-एम. डी. पाठक, प्रधान सचिव, नगरविकास विभाग
आम्ही मागणी केली होती
-महापालिकेतील उपायुक्त हे पद अनेक वर्षांपासून रिक्त होते. त्याठिकाणी कोणी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे आम्ही पांडे यांचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवला होता. नगरविकास विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला असेल. या सर्वांच्या मान्यतेने ऑर्डर निघाली असणर. शहराचा विकास करणे गरजेचे आहे.
-पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा
शासन निर्णयाला डावलून चुकीची पध्दतीने नियुक्ती
-उपायुक्त हे पद प्रशासकीय आहे. यामुळे यापदी नगरविकास विभागाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. लेखा व तांत्रिक सेवेतील अधिकाऱ्यांची बदली करू नये, असा शासन निर्णय आहे. परंतु शासन निर्णयाला डावलून चुकीच्या पध्दतीने नियुक्ती केली आहे. ती रद्द करावी.
-राजेश काळे, उपमहापौर, मनपा