कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होत नसल्याने ओरड
सोलापूर : स्मार्ट सिटी अंतर्गत नवी पेठ परिसरात सुरु असलेले रस्त्याचे काम
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहेत. इंदिरा गांधी पार्क स्टेडीअम, रंगभवन येथील पब्लिक प्लाझा, होम मैदान येथील स्ट्रीट बझार यासह काही कामे दिसण्यासाठी स्मार्ट झाली असली इतर कामांबाबत नागरिकांमधून कायमच ओरड होत आहे. आजवर स्मार्ट सिटी अंतर्गत जवळपास 350 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील 100 शहरे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत करण्यास सुरुवात केली. सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत 1 हजार 69 कोटी रुपयांची विकासकामे करायची आहेत. आजवर जवळपास 350 कोटींची कामे झाली आहेत. यात इंदिरा गांधी पार्क स्टेडीअम, रंगभवन येथील पब्लिक प्लाझा, होम मैदान परिसरातील स्ट्रीट बझार, हुतात्मा बागेचे सुशोभिकरण आदी कामे करण्यात आली आहेत. महापालिकेला घंटागाडÎा आणि डस्टबीनही देण्यात आले आहेत. नवी पेठ परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील महापालिका परिसर, डफरीन चौक, सिध्देश्वर मंदिर परिसर, होम मैदान, रंगभवन, लक्ष्मी मार्केट या परिसरात कामे केली आहेत. विशेष बाब म्हणून स्मार्ट सिटी परिसराच्या बाहेरही काही कामे सुरु आहेत. स्मार्ट सिटीची कामे संथगतीने सुरु असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. या काळात स्मार्ट सिटीच्या कामांना गती द्यायला हवी होती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेकडून निधी मिळत नाही
स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका यांच्याकडून मिळणाऱया निधीतून कामे केली जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापूर महापालिकेकडून स्मार्ट सिटीला निधी दिलेला नाही. महापालिकेकडून 127 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्रलंबीत आहे. महापालिकेकडून निधी नाही मिळाला तर केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळण्यास अडचणी येतील आणि त्याचा कामांवर परिणाम होईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
ही आहेत भविष्यातील कामे
– सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी
– इन्क्युबेशन सेंटर
– सिध्देश्वर तलावात लाईट ऍण्ड साउंड शो
– जलशुध्दीकरण प्रकल्प
– 28 शाळांना स्मार्ट करण्याचा प्रकल्प
– 14 स्मशानभूमीत विविध विकास कामे
नागरिकांनी स्मार्ट सिटीबाबत संयम ठेवावा
आजवर सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत 30 कामे पूर्ण झाली आहेत. सध्या 16 कामे चालू आहेत. काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. मी स्मार्ट सिटीचा पदभार घेतला तेव्हा सोलापूर देशात 72 व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षभरात कामांना गती आली आहे. सध्या सोलापूर 34 व्या क्रमांकावर आहे. काही कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. अर्धवट माहितीच्या आधारावर लोक टिका-टिप्पणी चालू करत आहेत. नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत संयम ठेवायला हवा.
– त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी