प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत. हातात तलवार घेऊन येऊन धमकी दिली असल्याची तक्रार राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे. गेल्या काही महिन्यात वीज बिल्याच्या वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत.
सोळांकूर येथे वीज वितरणाचे कर्मचारी नितेश हनुमंत शेडमाके व त्याचे सहकारी येथील प्रमोद शिवाजी कांबळे यांच्या घरातील वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी गेले होते. यावेळी थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित होईल असे सांगत असताना प्रमोद कांबळे याने वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आणि घरातून तलवार घेऊन येऊन नितेश शेडमाके याच्यावर मारण्यासाठी धावून गेला व घरातील पत्रा कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकून मारला.
यावेळी कर्मचारी वीज वितरणाच्या कार्यालयात गेले असता शिवाजी कांबळे, जीवन कांबळे यांनी कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना झाल्या प्रकाराबद्दल तक्रार देऊ नकोस असे म्हणून त्यांच्या कामात अडथळा आणल्याचे तक्रार राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे. या संदर्भात प्रमोद कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक फोजदार तानाजी कुदळे करत आहेत. गेल्या काही महिन्यात वीज बिलाच्या वसुली वरून मारामारीचे प्रकार वाढत आहेत यामुळे वीज कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत.