प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 16 गुन्ह्यात फरार असलेला अट्टल गुन्हेगार यश उर्फ नाना पाटेवकर भाऊबीज उर्फ भावज्या काळे (मुळ रा. फत्यापूर, सध्या रा. आसगाव) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्याकडील पथक तयार करुन अट्टल गुन्हेगार यश उर्फ नाना पाटेकर भाऊबीज उर्फ भावज्या काळे यास अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याचा शोध घेवून त्यास अटक केली. त्याने कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा, सातारा तालुका पोलीस ठाण्यात लुटमारीचा, भुईज पोलीस ठाण्यात मोटर चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत.