वार्ताहर / सावंतवाडी:
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापल्या घरीच आहेत. घरी बसून करायचे काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या काळात बांदा येथील अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱया मुलांनी अनोखा उपक्रम राबवत कलेची प्रचिती दिली आहे. कोरोनाला घाबरू नका. तो आलाय तसाच परत जाईल. तुम्ही फक्त तुमचा संयम जाऊ देऊ नका. घरी रहा.. सुरक्षित रहा, असा संदेश पहिली ते सातवीचे विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे देत जनजागृती करत आहेत.
सध्या शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाईन मार्गदर्शन सुरू आहे. वार्षिक परीक्षा झालीच नसल्याने मुलांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबाबत गोंधळ आहे. गावोगावी इंटरनेट मिळत नाही. शाळकरी मुले आपल्यापरीने वेळ घालवत आहेत. बांदा येथील संकेत वेंगुर्लेकर याने मुलांना एकत्र केले. त्यात चैतन्य तळवणेकर, विहान राणे, अमोघ वालावलकर, नाजुका खान, ऋत्विक काळे, खुशाल गावडे, रणवीत काळे, हर्ष कनयाळकर, भार्गव मालवणकर या मुलांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे कोरोनाबाबत संदेश देऊन एक वेगळा पायंडा घातला आहे. अशाचप्रकारे भोसले पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षाच्या संगणक विभागातील मुलांनी एकत्र येत कोरोनाविरुद्ध लढण्याचा उमेद देणारा संदेश देऊन जनजागृती चालविली आहे.