ऑनलाईन टीम / मुंबई :
स्वतःला शिवसेनेचा समर्थक म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावरून मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
जुबैर खान असे धमकी देणाऱ्याचे नाव असून, तो स्वतःला शिवसेनेचा समर्थक समजतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो भाजप पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर टार्गेट करत आहे. तसेच त्याने अश्लील भाषेत शिव्या देणारे काही व्हिडीओही अपलोड केले आहेत.
याप्रकरणी संबंधित आरोपीला त्वरित अटक करावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस अमित साटम आदी उपस्थित होते.
तेजिंदरसिंग तिवाना यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यातही जुबैर खान याच्याविरोधात विकृत भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.