सीमा लाटकर यांच्या कामाची परदेशातूनही दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना लॉकडाऊनच्या काळात बेळगाव जिल्हय़ातील अनेक अधिकाऱयांनी उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडली आहे. अशा अधिकाऱयांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक करणारी पोस्ट व्हायरल होत आहे.
तसेच गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कमलपंथ यांनी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांचे कौतुक केले आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर अत्यंत नियोजनबद्धरित्या काम सुरू आहे. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी येणाऱयांची तपासणी करण्याबरोबरच त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांचे कौतुक होत आहे.
कोरोनाच्या काळात पोलीस दलाने केलेल्या कार्याची सर्वत्र दखल केली जात आहे. आपापल्या भागात पोलीस अधिकाऱयांना बोलावून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जात आहे. सोशल मीडियावरही सीमा लाटकर यांच्या सेवेचे कौतुक करणाऱया पोस्ट व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बजावलेल्या कामगिरीमुळे ट्विटरवर परदेशातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. परदेशात राहणाऱया बेळगावकरांनी त्यांचे कौतुक करतानाच प्रत्येकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीसह वेगवेगळय़ा देशात राहणाऱया बेळगावकरांनी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा शब्दात सीमा लाटकर यांच्या सेवेचे कौतुक केले आहे.