हजारो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन, कोरोना नियमांचे पालन : यल्लम्मादेवी डोंगराचा विकास करण्याचे आमदारांचे आश्वासन
वार्ताहर /बैलहोंगल
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिर भाविकांसाठी मंगळवारपासून खुले करण्यात आले. यावेळी भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करत देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यल्लम्मा रेणुकादेवीच्या डोंगरावरच सोमवारी रात्री अनेक भाविकांनी मुक्काम केला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीच्या दर्शनाला सुरूवात झाली. यावेळी विधानसभा उपसभापती व यल्लम्मा डोंगर विकास समितीचे अध्यक्ष आमदार आनंद मामनी व बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. हजारो भाविकांनी यल्लम्मा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. थर्मल स्क्रिनिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. यावेळी आनंद मामनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, यल्लम्मादेवी डोंगराचा विकास करण्यात येणार असून निधी मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा करणार आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले की, जिल्हय़ात 81 टक्क्यांहून अधिक लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. डोंगरावर येणाऱया भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गर्दी झाल्यास ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालण्याची सूचनाही केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंदिराचे सीईओ रवि कोटारगस्ती, तहसीलदार महेश पाटील, बसय्या हिरेमठ, ए. बी. मुळळूर आदी मान्यवर उपस्थित होते.