कोरोनामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला दिलासा : उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदती येथील यल्लम्मा यात्रेसाठी नवरात्रोत्सव काळात दररोज जादा बसगाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे नवरात्रोत्सव काळातील सौंदती यल्लम्मा यात्रेतून परिवहनला दीड कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला मोठा दिलासा मिळाला.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी नवरात्रोत्सव काळात दररोज 40 हून अधिक अतिरिक्त बस सोडल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा यात्रेला जाणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला होता. त्याप्रमाणे या मार्गावर धावलेल्या विशेष बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाददेखील मिळाला. दरम्यान नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती यात्रेसाठी धावलेल्या बसच्या माध्यमातून परिवहनला दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. केवळ नऊ दिवसात दीड कोंटींहून अधिक उत्पन्न मिळाल्याने आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी कोरोनामुळे सौंदत्ती यल्लम्मा यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने यल्लम्मा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांची वर्दळ वाढली होती. दरम्यान नवरात्रोत्सव काळात दीड लाखांहून अधिक भाविकांनी यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले आहे. या काळात दैंनदिन दीड लाखांहून अधिक महसूल परिवहनला मिळत होता. तर संपूर्ण नवरात्रोत्सव काळात परिवहनकडे दीड कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे. मागील दोन वर्षांत परिवहनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यल्लम्मा यात्रेतून मिळालेला महसूल परिवहनला सावरण्यासाठी मदत ठरणार आहे.