नाजुक हातांनी चालविते अवजड वाहन
माणसाचा छंद आणि रुची तो पुरुष आहे का स्त्राr हे पाहून निर्माण होत नाही. छंद तर मनातून तयार होत असतात. अशाच एका सौंदर्यवतीला अवजड वाहन चालविणे पसंत आहे. 22 वर्षे वय असलेली मिली एवरलेटने कमी वयात स्थानिक सौंदर्य स्पर्धा जिंकली असून ती मिस इंग्लंडच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तरीही मॉडेलिंग सारखे शोबिज क्षेत्र निवडण्याऐवजी तिने लॉरी ड्रायव्हर होणे पसंत केले आहे.
मिल एवरलेट इंग्लंडच्या लिंकनशायर येथे राहते आणि तिने 4 वर्षांपूर्वी मिस इंग्लंडच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापूर्वी तिने मिस लिंकनशायरचा मान पटकाविला होता. सध्या मिली एवरलेट अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहे. दिसण्यास दुबळी सौंदर्यवती 44 टनाच्या लॉरीला सहजपणे ड्राइव्ह करते.
लॉरी आणि ट्रक चालविण्याची प्रेरणा कोरोना काळात मिळाली. ब्रेक्झिटनंतर देशात ट्रकचालकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे हा पेशा पुरुषांचा मानला जातो, परंतु महिलांनी लॉरी न चालविण्यामागे कुठलेच कारण नसल्याचे ती सांगते.
मिली ही क्लास 1 आणि क्लास 2 च्या एचजीव्ही लायसन्सचे प्रशिक्षण घेत आहे. कॅटवॉकपासून आता ती थेट महामार्गावर पोहोचली आहे. तिने 2018 मध्ये मिस लिंकनशायर असताना मिस चॅरिटी स्पर्धेतही भाग घेतला होता आणि त्याद्वारे लोकांना मदत केली होती.
इंग्लंडमध्ये ट्रकचालकांची संख्या कमी आहे आणि त्यात महिलांचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. अशा स्थितीत मिली ही ब्रिटिश समाजातील महिला लॉरी चालविण्यासारखे अवजड काम करू शकत नसल्याची धारणा मोडून काढू इच्छिते. आधुनिक महिला प्रत्येक कामात स्वतःची पात्रता सिद्ध करू शकतात असे तिचे सांगणे आहे.
मिली ही शेतकऱयाच्या कुटुंबाशी संबंधित असून सध्या ती शेतात लॉरी आणि ट्रक चालविण्याचे काम करते. लवकरच आपण महामार्गावरही हे काम करू शकू अशी तिला अपेक्षा आहे. मिलीची आई आणि बहिण दोघांनीही मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केले आहे.