घराचे अंतर्गत तसेच बाहय़ सौंदर्य फुलवण्यात एका गोष्टीचा वाटा नेहमीच सरस ठरत आला आहे. अर्थात तो आहे प्रकाशयोजनेचा. प्रकाशयोजनेच्याबाबतीत सर्वचजण विचार करतात असे नाही. कारण प्रकाशयोजनेमुळे लाईटबिलात वाढ होण्याची शक्यता असते, अशी समजूत अनेकांची झालेली असते. आजकाल एलईडी किंवा सीएफएलसारख्या उर्जा बचतीत सहाय्यकारक ठरणाऱया बल्बचा वापर करण्यात येत आहे. यांच्यामुळे सजावटीचे सौंदर्य फुलण्यास अधिक मदत होत आहे. मध्यमवर्गीयही आजकाल आपल्या घराच्या रचनेत प्रकाशयोजनेचं महत्त्व ओळखू लागले आहेत.
घराची रचना करताना प्रकाशयोजनेसाठीच्या आवश्यक पॉइंटस्ची जागा नक्की करावी लागते. आपल्या घरातील फर्निशिंग्ज आणि सजावटीच्या वस्तु चांगल्या असल्या तरी त्या अधिक उठून दिसायच्या असतील तर प्रकाशयोजनेची मदत घेणे आवश्यक ठरते. टेबल किंवा किचन कॅबिनेटखाली बसवलेल्या दिव्यांमुळे त्या खोलीतलं वातावरणच बदलून जातं. अशा प्रकारच्या सजावटीत आरशांच्या रचनेलाही महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं. शँडेलियर किंवा झुंबर ही आजची गरज झाली आहे. झुंबर हे खोलीनुरूप असायला हवे. त्यात वैविध्य असलं तरी चालतं पण आपल्या खोलीच्या डेकोरथीमला साजेसं ते हवं एवढी काळजी घ्यायला हवी. सजावटीत नाटय़ आणण्याचं काम ही झुंबरं नक्कीच करतात. यांचा वापर वॉक-इन-क्लोजेट, ड्रेसिंग रूम, किचन आदी ठिकाणीही करता येतो. तशी जर आपली गरज असेल तर दुकानदाराबरोबर बोलून योग्य किमतीला तीन झुंबरं खरेदी करता येतात.
प्रकाश बल्ब, डाऊनलाइटस्, रिसेसड् लाइटिंग, वॉल लाइटस् तसेच टेबल आणि फ्लोअर लॅम्पच्या माध्यमातून प्रकाशयोजना प्रभावीपणे राबवली जाऊ शकते. त्यासाठी तज्ञाची मदत घेता येते. डायनिंग टेबलावर मोठय़ा आकाराचं झुंबर असल्यास तेथील वातावरणच उबदार होऊन जातं. याव्यतिरीक्त हवं असल्यास बाटल्यांप्रमाणे पेंडंट दिवेही टेबलवर बसवता येतात. त्यांची टेबलावरची एका रेषेतील दिव्यांची रांग वातावरणात रंग भरत असते. पेंडंट दिवे खूप साऱया डिझाइन्समध्ये पाहायला मिळतात.
या प्रकाशयोजनेत आरशांचा वापरही तितकाच महत्त्वाचा ठरतो. हे आरसे ही प्रकाशयोजना अधिक खुलवून दाखवण्याची किमया पार पाडतातच शिवाय खोलीतली जागा अधिक स्पेशियस असल्याचा भास उत्पन्न करतात. बाजारातून अँटीक आरसे खरेदी करून त्यांचा समावेश अंतर्गत सजावटीत करता येतो. लिव्हिंगरूममधील भिंत रिकामी असेल तर त्यावर एखादे सुंदर असे पेंटिंग लावता येते आणि त्यावर प्रकाशदिव्याचा प्रकाश सोडता येतो.