पीआयएफ 2.32 टक्के हिस्सेदारी घेणार : कर्जमुक्तीचे ध्येय पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ प्लॅटफार्ममध्ये आता अकरावी कंपनी सौदी अरबचा वेल्थ फंड पब्लिक इनवेस्टमेंट फंड (पीआयएफ) 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या जोरावर जिओमधील 2.32 टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने दिली आहे.
रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार पीआयएफने जिओ प्लॅटफॉर्मने जिओच्या 4.91 लाख कोटी रुपयाच्या इक्विटी मूल्याइतकी गुंतवणूक केली आहे. ज्याचे एन्टरप्राईजेस मूल्य 5.16 लाख कोटी निश्चित केले आहे. ही जिओमधील आतापर्यंतची 11 वी गुंतवणूक आहे.
जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीचा प्रारंभ हा फेसबुकने केल्यानंतर पाठोपाठ सिल्वरलेक पार्टनर्स, विस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबादला, अबूधाबी इन्वेस्टमेंटसह अन्य कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
रिलायन्सने 58 दिवसात 1.68 लाख कोटी उभारले
रिलायन्सचे कर्जमुक्तीचे ध्येय साध्य
रिलायन्सने कमीत कमी कालावधीत म्हणजे 58 दिवसांमध्ये 1,68.818 लाख कोटी रुपये उभारले आहेत. यामध्ये जिओ प्लॅटफॉर्म आणि राईट इश्यू याच्या मदतीने ही रक्कम जमा केली आहे. जिओने जागतिक गुंतवणूकदारांच्या मदतीने जवळपास 1,15,693.95 कोटी जमा केले आहेत. दुसऱया बाजूला राइट इश्यूच्या सहाय्याने 53,124.20 कोटी उभारले आहेत. रिलायन्स 31 मार्च 2020 पर्यंत 1,61,035 लाख कोटीचे कर्ज फेडणार होते. परंतु या गुंतवणुकीच्या जोरावर रिलायन्स आता कर्जमुक्त झाली आहे, अशी माहिती रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली आहे.
डेटा अर्थव्यवस्था होणार मजबूत : मुकेश अंबानी
आम्ही काही दशकापासून सौदी अरबसोबत चांगले संबंध जोपासत आलो आहे. याचेच हे फळ असल्याचे दिसून येत असून पीआयएफशी हातमिळवणी ही डेटा अर्थव्यवस्थेला मजबूतीकडे घेऊन जाणारी ठरेल हे नक्की.
जिओत गुंतवणुकीमुळे आनंद : अल-रुम्यायन
भारतामधील तंत्रज्ञान बाजारात क्रांतीकारी बदल घडून येत आहेत. यात रिलायन्सचा वाटाही अधिक असल्याने त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्याचा आनंद होत आहे. कारण भारताची डिजिटल अर्थक्यवस्थेची क्षमता अधिक सक्षम होण्यास यश मिळणार आहे.