वृत्तसंस्था/ अल मुरूज, सौदी अरेबिया
सौदी अरेबियात होणाऱया महिलांच्या पहिल्या व्यावसायिक गोल्फ स्पर्धेचे पुनर्नियोजन करण्यात आले असून आता ती 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस महासाथीमुळे गेल्या महिन्यात ती लांबणीवर टाकण्यात आली होती.
लेडीज युरोपीयन टूरचा भाग असलेली सौदी लेडीज इंटरनॅशनल गोल्फ स्पर्धा सौदीतील रॉयल ग्रीन्स गोल्फ अँड कंट्री क्लब कोर्सवर घेतली जाणार असून 10 लाख डॉलर्स एकूण बक्षीस ठेवण्यात आले आहे. सौदीमध्ये आयोजित करण्यात आलेली ही महिलांची पहिलीच गोल्फ स्पर्धा असल्याने तिला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘गोल्फ सौदी बांधिलकी जपताना आव्हानाला सामोरे जात ही ऐतिहासिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी जे कार्य करीत आहे, त्याने आम्ही प्रभावीत झालो आहोत,’ अशा भावना एलईटीचे सीईओ अलेक्झांड्रा अरमास यांनी व्यक्त केल्या. 14 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकन महिला ओपन गोल्फ स्पर्धा झाल्यापासून टूरवरील स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. जाब्रा लेडीज ओपन ही पुढील स्पर्धा फ्रान्समधील एव्हियन रिसॉर्ट गोल्फ क्लब येथे 18-20 जून या कालावधीत होणार आहे.