चीनच्या मध्यस्थीला मिळाले यश
वृत्तसंस्था / रियाध
पश्चिम आशियातील देश इराण आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश परस्पर संबंध पुन्हा बहाल करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान चीनच्या मध्यस्थीने एक करार झाला आहे. या करारानुसार दोन्ही देश परस्परांना सहकार्य करण्यास तयार झाले आहेत.
सौदी अरेबिया आणि इराणच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी शुक्रवारी स्वतःचे दूतावास पुन्हा सुरू करण्याची योजना आखली जात असल्याचे शुक्रवारी सांगितले आहे. 7 वर्षांनी दोन्ही देश स्वतःचे राजनयिक संबंध पुन्हा स्थापन करण्यास सहमत झाले आहेत.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली शामखानी, सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार मोसाद बिन मोहम्मद अल-ऐबन आणि चीनचे मुत्सद्दी वांग यी यांच्यात बीजिंगमध्ये 6 मार्चपासून चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर काही प्रमाणात यश आले आहे.
या बीजिंग डायलॉगने सौदी अरेबिया-इराणच्या संबंधांचा एका नवा अध्याय सुरू केला आहे. दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त करत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सहमती निर्माण करण्याची तयारी दर्शविली आहे. इराण आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश दोन महिन्यांमध्ये दूतावास पुन्हा सुरू करण्यावर सहमत झाले असल्याची माहिती चीनचे मुत्सद्दी वांग यी यांनी दिली आहे.
परस्परांच्या सार्वभौमत्वाचा आदर
करारातील निर्णय लागू करण्यासाठी दोन्ही देशांचे विदेशमंत्री परस्परांना भेटतील आणि राजदूतांच्या आदान-प्रदानसाठी आवश्यक व्यवस्था करतील असे इराण आणि सौदी अरेबियाच्या संयुक्त वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही देश परस्परांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करण्यावर आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्यावर सहमत झाल्याचे म्हटले गेले आहे.
2016 मध्ये तुटले होते संबंध
इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणाव 2016 मध्ये शिगेला पोहोचला होता. सौदी अरेबियात एका शिया धर्मगुरुला त्यावेळी फासावर लटकविण्यात आले होते. याच्या विरोधात इराणच्या राजधानीतील सौदी अरेबियाच्या दूतावासावर निदर्शकांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर सौदी अरेबियाने इराणसोबतचे संबंध संपुष्टात आणले होते. तेव्हापासून दोन्ही देश परस्परांविरोधात छुपे युद्ध लढत आहे, यामुळे अनेक शेजारी देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.