वृत्तसंस्था/ कतार
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासेर फुटबॉल क्लबशी नुकताच नवा करार केला आहे. या करारापोटी या क्लबला किमान 200 दशलक्ष युरोची रक्कम मोजावी लागली आहे.
सौदी अरेबियाचा अल नासेर फुटबॉल क्लब आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यात हा करार झाला असून कराराची मुदत 2025 च्या जूनपर्यंत आहे. रोनाल्डो यापूर्वी मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि ज्युवेंट्स या फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व करीत होता. अल नासेर फुटबॉल क्लबच्या ट्विटरवर रोनाल्डोचे नव्या जर्सीसमवेत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जर्सीवर सात हा क्रमांक आहे. रोनाल्डोचा या क्लबमध्ये समावेश झाल्याने भविष्य काळात या क्लबची कामगिरी विविध स्पर्धांमध्ये निश्चितच दर्जेदार होईल अशी आशा या क्लबच्या फ्रँचाईजीने व्यक्त केली आहे. 2019 पासून सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्षेत्रात अल नासेर फुटबॉल क्लब हा अव्वल म्हणून ओळखला जातो. या क्लबने नऊवेळा सौदी अरेबियन लीग फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत.
कतारमध्ये अलीकडेच झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोकडून हार पत्करावी लागली. या पराभवामुळे पोर्तुगालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यावेळी रोनाल्डोला पूर्वार्धात राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसावे लागले होते. पण उत्तरार्धातील खेळाच्या जवळपास 25 मिनिटांमध्ये त्याला मैदानात उतरविण्यात आले होते. रोनाल्डो यापूर्वी ज्युवेंट्स फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व करीत होता. ज्युवेंट्स क्लबने त्याच्याबरोबर 31 दशलक्ष युरो मानधनाचा करार केला होता. सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूशी नुकताच झालेला हा सर्वात महागडा करार असल्याचे सांगण्यात आले. रोनाल्डोने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत पाचवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविले होते. तसेच त्याने इटलीमध्ये 2019 आणि 2020 साली आपल्या क्लबला लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डो या सर्वात अधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू आहे. पोर्तुगाल संघाला त्याने 2016 साली युरो चषक फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती.