वृत्तसंस्था/ ओस्जेक (क्रोएशिया)
सोमवारपासून येथे सुरू झालेल्या युरोपियन नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज सौरभ चौधरी आणि इलावेनिल यांनी आपल्या कामगिरीला दमदार सुरूवात केली आहे. या स्पर्धेत भारताचे 10 नेमबाज सहभागी झाले आहेत.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारताच्या 13 जणांच्या संघातील 10 नेमबाजांनी युरोपियन नेमबाजी स्पर्धेत सहभाग दर्शविला आहे. ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी भारतीय नेमबाजांना क्रोएशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान या सराव प्रशिक्षण शिबिराखेरीज भारतीय नेमबाजांना दर्जेदार कामगिरी करण्याची संधी युरोपियन नेमबाजी स्पर्धेने उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेत भारतीय नेमबाज मिनिमम क्वालिफिकेशन स्कोअर (एमक्यूएस) गटातून नेमबाजी करताना पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सौरभ चौधरीने 589 गुण नोंदवित आघाडीचे स्थान मिळविले. त्याचप्रमाणे या विभागात भारताच्या अभिषेक वर्माने 579 गुण नोंदवित चौथे स्थान मिळविले आहे. युक्रेनचा ओमेलचूक 586 गुणांसह प्रमुख पात्र फेरीत दुसऱया स्थानावर आहे.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या इलावेनिल वलरिवन हिने प्रमुख पात्र फेरीत 630.4 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून इराणच्या सादेगेन 629.8 गुणांसह दुसऱया आणि इराणच्या फतिमा करमजादेहने 628.7 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. या क्रीडाप्रकारात भारताची अपूर्वी चंडेला 627.8 गुणांसह चौथ्या आणि अंजुम गोदगील 624.7 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. महिलांच्या 10 मी एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या यशस्वीनी सिंग देसवाल आणि मनू भाकर यांनी अनुक्रमे 572 आणि 573 गुण नोंदविले आहेत.