ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने समलैंगिक ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली होती. ही शिफारस आता मान्य झाली आहे. त्यामुळे सौरभ कृपाल हे भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक 11 नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीही वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडे कृपाल यांच्या नियुक्तीबाबत विचारणा केली होती. दरम्यान, यापूर्वी चारवेळा झालेल्या चर्चांमध्ये कृपाल यांच्याविषयीची मते विभागली होती. 2017 मध्येही कॉलेजियमने पहिल्यांदा कृपाल यांच्या नावाची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती. मात्र, आता त्यांची शिफारस मान्य करण्यात आली असून, कृपाल हे भारताचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होतील.