कोलकात्यातील खासगी इस्पितळात दाखल
कोलकाता
बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली यांना कोरोनाची बाधा झाली असून सोमवारी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांचे पूर्ण लसीकरण झाले असून अलीकडील कालावधीत त्यांनी सातत्याने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. 49 वर्षीय गांगुली यांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी रात्रीच खबरदारीचा उपाय म्हणून इस्पितळात हलवले गेले. ‘सोमवारी रात्री गांगुली यांना वूडलँड नर्सिंग होममध्ये दाखल केले गेले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे’, असे बीसीसीआयमधील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गांगुली यांना या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात देखील दोनवेळा इस्पितळात दाखल करावे लागले होते. त्यात एकदा त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लॅस्टीही केली गेली. सौरभ यांचे मोठे बंधू स्नेहाशिष यांनाही या वर्षात कोरोनाची बाधा होऊन गेली आहे.