कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर गुरुवारी आणखी एक अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिनीत निर्माण झालेल्या गाठी दूर करण्यासाठी यावेळी आणखी दोन स्टेन्ट घातले गेले आहेत. एका खासगी इस्पितळात सदर उपचार सुरु असून गांगुली यांची प्रकृती ‘स्थिर’ असल्याचे इस्पितळाकडून सांगितले गेले आहे.
48 वर्षीय सौरभ गांगुलींना यापूर्वी बुधवारी छातीत वेदना जाणवल्याने तातडीने खासगी इस्पितळात दाखल केले गेले. त्यानंतर दिवसभरात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या घेतल्या गेल्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर दुसऱयांदा अँजिओप्लॅस्टीचा निर्णय घेतला गेला. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या गांगुली यांना जानेवारीतच हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला असून प्रारंभी रक्तवाहिनीत तिहेरी ब्लॉक असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी त्यांच्यात एक स्टेन्ट घातली गेली आणि आवश्यकता भासली तरच दुसऱयांदा अँजिओप्लॅस्टी करावी लागेल, असे जाहीर केले गेले होते.