आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/ कैरो, इजिप्त
भारतीय युवा नेमबाज सौरभ चौधरीने येथे सुरू असलेल्या या वर्षातील पहिल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
सुवर्णपदकाच्या फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णजेत्या सौरभने 16 शॉट्स नोंदवत पहिले स्थान मिळविले. जर्मनीच्या मायकेल श्वाल्डने 6 गुण नोंदवले तर रशियाच्या अर्टेम चेर्मूसोव्हने कांस्यपदक मिळविले. रशियाने सध्या युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले असल्याने या स्पर्धेत रशियाचा राष्ट्रध्वज काढून टाकण्यात आला आहे. 19 वर्षीय सौरभने युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळविले होते. येथील पात्रता फेरीत त्याने 584 गुण घेत तिसरे स्थान मिळवून एलिमिनेशन फेरीत स्थान मिळविले. 92 जणांच्या पात्रता फेरीत रशियाच्या चेर्मूसोव्हने 591 गुण घेत पहिले स्थान पटकावले होते. अंतिम टप्प्यातील रिले 1 मध्ये सौरभने 38 गुण घेत पहिले स्थान मिळविल्याने त्याला पदकाच्या फेरीत स्थान मिळाले. सौरभप्रमाणे चेर्मूसोव्हनेही 38 गुण घेतले होते. यासाठी चार नेमबाज पात्र ठरले होते. पदकाच्या फेरीत श्वाल्ड व अझरबैजानचा रुसलान लुनेव्ह यांनीही रिले 2 मधून स्थान मिळविले होते.
चार नेमबाजांच्या 15 शॉट्सच्या फेरीत सौरभने 42.5 गुण घेतले तर श्वाल्डने 41.5 गुण मिळवित दुसरे स्थान आणि चेर्मूसोव्हला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सौरभचे हे आयएसएसएफ वर्ल्ड कपमधील तिसरे वैयक्तिक सुवर्ण असून नव्या फॉरमॅटप्रमाणे मिळविलेले हे पहिलेच सुवर्ण आहे.
60 देशांच्या 500 हून अधिक नेमबाजांनी या स्पर्धेत भाग घेतला असून एकूण 20 पदके यासाठी ठेवण्यात आली आहेत. फ्रान्स, इटली व भारत यांनी प्रत्येकी 1 सुवर्णपदक मिळवित सध्या अग्रस्थान मिळविले आहे.