वृत्तसंस्था /ओसिजेक, क्रोएशिया
भारताच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्य मिळवित आयएसएसएफ विश्व चषक स्टेज 3 स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते खोलले. त्यानंतर दुसऱया दिवशी महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल संघानेही कांस्यपदक मिळवित त्यात आणखी एका पदकाची भर घातली.
या स्पर्धेच्या पहिल्या व दुसऱया दिवशीही भारताला संमिश्र यश मिळाले. सौरभने पदक मिळविले तर मनू भाकर व इलावेनिल वलरिवन यांना पदकापर्यंत मजल मारता आली नाही. दुसऱया दिवशी शुक्रवारी महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारतीय संघाने कांस्य मिळविले. मनू भाकर, यशस्विनी सिंग देसवाल व राही सरनोबत यांनी हंगेरीच्या व्हेरोनिका, मिरियम, सारा फॅबियन यांच्यावर 16-12 अशा फरकाने मात केली.
सौरभचे यश त्याआधी गुरुवारी 19 वर्षीय सौरभने पात्रता फेरीत 581 गुण मिळविल्यानंतर अंतिम फेरीत 220 गुण मिळविले. अभिषेक वर्माला याच प्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने पात्रता फेरीत 581 व अंतिम फेरीत 179.3 गुण नोंदवले. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत मनू भाकरने सातवे स्थान मिळविताना अंतिम फेरीत 137.3 गुण मिळविले तर वलरिवनला अन्य दोघींसह महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत अंतिम फेरीही गाठता आली नाही. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने सातवे स्थान मिळविले. ऑलिम्पिकआधी ही शेवटची नेमबाजी स्पर्धा आहे.