ऑनलाईन टीम
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी जीममध्ये व्यायाम करत असताना सौरवच्या छातीत दुखू लागले त्यानंतर त्याला तात्काळ दक्षिण कोलकाता मधील वूडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सांयकाळी गांगुलीवर अँजिओप्लास्टी (angioplasty) होणार आहे.
गांगुलीला शुक्रवारी रात्रीपासूनच बरे वाटत नव्हते. मात्र, त्याने शनिवारी दैनंदिन वेळापत्राकनुसार कामास सुरुवात केली. सकाळी जीममध्ये व्यायाम करतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी येत होती. तसेच छातीत दुखू लागल्याने त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गांगुलीबद्दल माहिती मिळताच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. तसेच इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर गांगुलीने लॉर्डच्या गॅलरीत जर्सी काढून केलेले सेलिब्रेशनही सर्वांच्या लक्षात आहे.