वृत्तसंस्था / दुबई :
क्लब स्तरावरील संघांनी आपल्या जर्सीचे शानदार सोहळय़ात, कार्यक्रमात अनावरण करणे, फोटोसेशन करणे नवे नाही. पण, राजस्थान रॉयल्स संघाने यंदा चक्क स्काय डायव्हर्सना पाचारण करत स्काय डायव्हिंगच्या थरारक अनुभवासह जर्सीचे थाटात अनावरण केले. या स्पर्धेत सहभागी उर्वरित सर्व संघांसाठी हा आश्चर्याचा धक्का ठरला. राजस्थानने यासाठी स्पॅनिश स्काय डायव्हिंग टीमला तैनात केले होते.
दुबईतील वन अँड ओनली रिसॉर्टच्या बीचवर हा थरारक अनुभव सर्वांनी अनुभवला. रेड बुल स्काय डायव्हिंग व विंगसुट ऍथलिट डॅनी रोमनने वाऱयाच्या वेगाने स्काय डायव्हिंग करत जर्सीचे अनावरण केले. स्पॅनिश पथकाच्या सर्व पॅराशूटर्सनी यावेळी राजस्थान रॉयल्सची नवी जर्सी खेळाडूंकडे सुपूर्द केली.
स्पॅनिश स्काय डायव्हर्सनी काही हजार फुट उंचावर असताना विमानातून उडी घेतली. त्यांनी समवेत राजस्थान रॉयल्सची बॅगपॅकही पाठीवर घेतली होती. या बॅगेत राजस्थान रॉयल्स संघातील जर्सी होती. ती त्यांनी हवेतून खाली खेळाडूंच्या दिशेने फेकली आणि खेळाडूंनी त्यावर उडय़ा टाकल्या. या प्रकारचे जर्सी अनावरण आपल्यासाठी अगदीच नवे होते, अशा प्रतिक्रिया राजस्थानच्या खेळाडूंनी व्यक्त केल्या.
राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरने यावेळी आपण केलेल्या स्काय डायव्हिंगच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, ‘दुबईतच मी काही वर्षांपूर्वी स्वतः स्काय डायव्हिंग केले होते. त्या आठवणी ताज्या झाल्या. राजस्थानने या अभिनव उपक्रमाची आम्हाला आज सकाळपर्यंत काहीही कल्पना दिली नव्हती. सकाळच्या सत्रात त्यांनी आम्हाला बीचवर नेले आणि काही क्षणात विमानातून उडी घेणाऱया पॅराशूटर्सनी आमच्या दिशेने संघाची नवी जर्सी असणारे बॅगपॅक अलगद खाली सोडले. हा आमच्यासाठी अतिशय वेगळा, सुखद अनुभव होता’.
यंदा राजस्थानच्या मोहिमेचा प्रारंभ दि. 22 रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीने होईल.
ही लढत शारजामध्ये खेळवली जाणार आहे.