मध्यप्रदेशातील विद्यार्थ्याने शोधला अनोखा पर्याय
कोरोना संक्रमणाच्या काळातील टाळेबंदीमुळे सर्वाधिक प्रयोग शिक्षणाच्या क्षेत्रातच झाले आहेत. शाळेत वर्गातील नियमित शिक्षणाचा पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण हाती घेण्यात आले. तर स्कुलबस बंद झाल्यावर अनोखा पर्याय मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्हय़ातील गावाच्या एका विद्यार्थ्याने शोधला आहे. हा विद्यार्थी आता स्वतःच्या घोडय़ावर स्वार होऊन शाळेत जातो. हा विद्यार्थी कुठल्याही राजघराण्याचा सदस्य नसून शेतकऱयाचा मुलगा आहे. स्कुलबस बंद झाल्यावर शिक्षणाच्या ओढीतून या विद्यार्थ्याने घोडय़ालाच स्वतःच्या वाहतुकीचे साधन केले आहे.
ग्रामीण भागांमध्ये शाळेत जाण्यासाठी कुणाला नदी पार करावी लागते, तर काही जणांना दोरखंडाच्या तात्पुरती पुलावरून जोखीम पत्करून प्रवास करावा लागतो. पण खंडवा जिल्हय़ातील गुराडीमाल गावातील 12 वर्षीय शिवराज स्वतःच्या पाठीवर दफ्तर अडकवून मित्र राजाच्या (घोडा) पाठीवर बसून घरातून निघतो, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळलेल्या असतात.
शिवराजचा हा छंद नसून त्याची हतबलता आहे. टाळेबंदीनंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरीही स्कुलबस सुरू झालेल्या नाहीत. घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत सायकलवरून जाताना एकदा पडून जखमी झाला होता. त्यानंतर सायकलला स्पर्श करण्याचे धाडस त्याला झाले नाही. या अडचणीत त्याचा मित्र असलेला घोडाच आठवला. शेतीच्या कामामुळे शिवराजचे वडिल देवराम यांना दररोज शाळेत सोडण्यासाठी शक्य होत नाही. शिवराज स्वतःच्या वर्गातील एकही तास चुकवत नाही, तर घोडा आणि शिवराज परस्परांना थोडय़ा वेळेसाठीही नजरेआड होऊ देत नाहीत.