मुलांची ने-आण करण्यासाठी कुटुंबाला 51 हजार रुपये देत आहेत शाळा
महामारीच्या या आव्हानात्मक काळात अमेरिकेतील शाळांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसोबत मुलांना बोलाविणे सुरू केले आहे, पण एक नवी समस्या मुलांना शाळेपर्यंत नेण्यास अडथळा ठरली आहे. अमेरिका आता स्कूल बसचालकांच्या कमतरतेला तोंड देत आहे.
याचमुळे आता शाळा नव्या बसचालकांच्या नियुक्तीवेळी 2.5 ते 3 लाख रुपये सायनिंग बोनसच्या रुपात देत आहेत. त्यांच्याकरता छोटे बसमार्ग प्रस्तावित केले जात आहेत, तसेच मनाजोगी वेळ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
आईवडिलांना देत आहेत पैसे
याचबरोबर स्वतःच्या मुलांना शाळेत सोडणे आणि नेणाऱया आईवडिलांना शाळेकडून पैसे दिले जात आहेत. डेलावेयरच्या विल्मिंग्टनमध्ये ईस्टसाइड चार्टर स्कूल मुलांना शाळेत सोडणाऱया आणि तेथून नेणाऱया कुटुंबांना 51 हजार रुपये देत आहे. आतापर्यंत 180 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
सायनिंग बोनस
असोसिएशननुसार चालकाला व्यावसायिक परवाना मिळविण्यास 8 आठवडे लागतात. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रशिक्षणात अधिक वेळ लागतो, याचमुळे आता चालकांना पाचारण करण्यासाठी नवनव्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत. मोंटानाच्या हेलेनामध्ये स्कूल बस कंत्राटदार ‘फर्स्ट स्टुडंट’ने नव्या चालकांच्या भरतीवेळी 3 लाख रुपयांचा सायनिंग बोनस देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पिट्सबर्गमध्ये सर्व शाळांनी सायनिंग बोनस 2.5 लाख रुपये केला आहे.
स्कूल मार्गामध्ये घट
चालकांच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी शाळा अभिनव पद्धती अवलंबित आहेत. जॉर्जियाच्या काही शाळांमध्ये 100 चालकांची कमतरता आहे. याचमुळे त्यांनी मार्ग छोटे केले आहेत. जुन्या चालकांना कामावर परतल्यास 3 लाख रुपये बोनसदाखल दिले जात आहेत.