पियरलँड (अमेरिका)
आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या लीग-2 स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार काईल कोएत्झरच्या शानदार शतकाच्या जोरावर स्कॉटलंडने संयुक्त अरब अमिरातचा 4 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातने 50 षटकात 9 बाद 215 धावा जमविल्या. त्यानंतर स्कॉटलंडने 6 बाद 217 धावा जमवित विजय नोंदविला.
संयुक्त अरब अमिराततर्फे चिराग सुरीने 121 चेंडूत 69 तर रिजवानने 57 चेंडूत 55 धावा झळकविल्या. अमिरात संघातील शेराफूने 25 चेंडूत 22 धावा फटकाविल्या. स्कॉटलंडतर्फे ख्रिस सोलेने 27 धावात 4 गडी बाद केले. अँड्रियन निलने 2 तर ताहिरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडच्या डावात कर्णधार आणि सलामीचा फलंदाज काईल कोएत्झरने सहाव्या गडय़ासाठी मिचेल लिसेक समवेत 114 धावांची भागीदारी केली. कोएत्झरने 108 तर लिसेकने 47 धावा जमविल्या. अमिराततर्फे बेसिल अमितने 43 धावात 2 गडी बाद केले. अहमद रजाने 2 बळी मिळविले. तसेच जुनेद सिद्दकी आणि रिजवान यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिरात- 50 षटकात 9 बाद 215 (चिराग सुरी 69, रिजवान 55, ख्रिस सोले 4-27), स्कॉटलंड- 6 बाद 217 (कोत्झेर नाबाद 108, लिसेक 47, हमीद 2-43).