वृत्त संस्था/ अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेंच्या सुपर 12 संघात स्थान मिळविताना पात्र फेरीच्या स्पर्धेत 2 सामने नामिबियाने जिंकले. आता हा संघ बुधवारच्या सामन्यात स्कॉटलंडला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
नामिबिया संघाचे नेतृत्व इरासमूसकडे आहे. जागतिक क्रिकेटमध्ये नामिबियाच्या क्रिकेटपटू बरेच नवखे आहेत. पात्र फेरीच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नामिबियाने हॉलंडचा 6 गडय़ांनी तर त्यानंतर दुसऱया सामन्यात आयर्लंडचा आठ गडय़ांनी पराभव करत सुपर 12 संघातील आपले स्थान निश्चित केले. आयसीसी कसोटी दर्जा प्राप्त केलेल्या आयर्लंड संघावर नामिबियाचा हा पहिला विजय असून त्यांनी पुढील वर्षी होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
गट-2 मधील समावेश असलेल्या नामिबिया संघाला अफगाण, भारत, पाक आणि न्यूझीलंड संघाविरूद्ध लढत द्यावी लागणार आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेत स्कॉटलंडने सलग तीन विजय मिळविल्यानंतर त्यांना अफगाण संघाकडून पराभव पत्करावा लागला. कर्णधार इरासमूस, अष्टपैलू डेव्हिड व्हिएज हे नामिबिया संघातील प्रमुख फलंदाज आहेत. स्कॉटलंड संघाची फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने बेरिंग्टन, मुनसे आणि क्रॉस यांच्यावर अवलंबून राहील. बुधवारच्या सामन्यात स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा नामिबियाच्या फलंदाजासमोर कस लागू शकतो.