मडगाव : स्कॉट नॅव्हीलने इंज्युरी वेळेत केलेल्या गोलामुळे सातव्या हिरो आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात ईस्ट बंगालने केरळ ब्लास्टर्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. वास्कोच्या टिळक मैदानावर काल हा सामना खेळविण्यात आला. या बरोबरीने उभय संघांना प्रत्येकी 1 गुण प्राप्त झाला.
मध्यंतरास गोलशून्य बरोबरीची कोंडी होती. आघाडीफळीतील ऑस्ट्रेलियाचा जॉर्डन मरे याने दुसऱया सत्रात केरळ ब्लास्टर्सचा गोल केला. ईस्ट बंगालला बचावफळीतील ब्रिटनचा 32 वर्षीय खेळाडू स्कॉट नेव्हील याने भरपाईच्या वेळेत बरोबरी साधून दिली.
ईस्ट बंगालने आपल्या अकराव्या सामन्यांत पाचवी बरोबरी साधली. दोन विजय व चार पराभवाने त्यांचे आता 11 गुण झाले व त्यांचे नववे स्थान कायम राहिले. केरळ ब्लास्टर्सचे दहावे स्थान कायम राहिले. 11 सामन्यांत दोन विजय, चार बरोबरी व पाच पराभवाने अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले.
खाते उघडण्याची शर्यत केरळ ब्लास्टर्सने जिंकली. गोलरक्षक आल्बिनो गोम्सने केरळ ब्लास्टर्सच्या बॉक्समधून थेट जॉर्डन मरेच्या दिशेने लांबवर चेंडू फेकला. मरेने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळविला. आणि संतुलन साधत नेटच्या दिशेने फटका मारला. भरपाई वेळेत ईस्ट बंगालला कॉर्नर मिळाला. ब्राईट एनोबाखरे याने घेतलेल्या कॉर्नरवर नेव्हीलने चेंडू नेटमध्ये घालविला होता.
या सामन्यानंतर मुंबई सिटी एफसी 10 सामन्यांतून आठ विजयासह 25 गुण मिळवून आघाडीवर आहे.