वृत्तसंस्था/ कोलकाता
आगामी होणाऱया हिरो पुरस्कृत इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी जागतिक स्तरावरील अनुभवी फुटबॉलपटू स्कॉट नेव्हेलीबरोबर इस्ट बंगाल एफसी क्लबने नुकताच नवा करार केला आहे.
स्कॉट नेव्हेली हा ए लीग फुटबॉल स्पर्धेतील बचावफळीत अनुभवी फुटबॉलपटू ओळखला जातो. यापूर्वी तो ब्रिस्बेन रोअर क्लबकडून खेळत होता. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामा करिता इस्ट बंगालने ब्रिस्बेन रोअर संघाकडून दीर्घ मुदतीच्या करारावर खरेदी केले आहे. इस्ट बंगालचे नवे प्रशिक्षक रॉबी फॉलेर यांच्या मार्गदर्शनाचा नेव्हेलीला यापूर्वी चांगलाच अनुभव आहे. स्कॉट नेव्हेलीबरोबर मंगळवारी लेखी करार केल्याची माहिती श्री सिमेंटचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बांगुर यांनी दिली. 2019-20 च्या फुटबॉल हंगामात नेव्हेलीने केवळ दोन सामने वगळता इतर सर्व सामन्यांत ब्रिस्बेन रोअरचे प्रतिनिधीत्व केले होते. ए लीग फुटबॉल स्पर्धेत नेव्हेलीच्या शानदार कामगिरीमुळे ब्रिस्बेन रोअरने चौथे स्थान मिळविले आहे. ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदा झालेल्या ए लीग फुटबॉल हंगामात नेव्हेलीने 25 सामन्यात आपला सहभाग दर्शविला. आपल्या जवळपास दशकाच्या फुटबॉल कारकीर्दीत नेव्हेलीने 223 सामन्यांत खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या फुटबॉल संघात त्याचा यापूर्वी समावेश करण्यात आला होता.