वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या फॅन्ससोबत सर्वच भारतीयांना आश्चर्याचा धक्का देणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वोग या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजवर स्टायलिश अवतारात सायना झळकली आहे. वोग मासिकाने आपल्या ‘वोग इंडिया’ या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची घोषणा केली आहे. यावेळी ‘वोग इंडिया’कडून मॅक्झिनच्या कव्हर पेजचा फोटोही ट्विट करण्यात आला आहे. कव्हर पेजच्या या फोटोमध्ये सायनाचा एक वेगळाच अंदाज दिसून येत आहे.
गत आठवडय़ात सायना नेहवालने भाजपामध्ये प्रवेश केला. राजकीय कोर्टवर सायनाने एन्ट्री केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावेळी अनेकांनी तिला ट्रोलही केले. दरम्यान, आता सायना पुन्हा चर्चेत आली आहे ती वोग मॅक्झनिच्या कव्हर पेजवर झळकल्याने. वोग इंडियाच्या फेब्रुवारी, 2020 च्या अंकाच्या कव्हर पेजवर सायना नेहवाल झळकली आहे. या कव्हर पेजमध्ये सायना काहीशी कूल अंदाजात दिसत आहे. सायनाच्या हेअर आणि मेकपसाठी मितेश रजानी यांनी मेहनत घेतली आहे तर कव्हरपेजसाठी फ्रान्सेस्को यांनी फोटोग्राफी केली आहे. ‘नवे विक्रम व नवा इतिहास रचणारी सायना’ असे म्हणत वोग इंडियाने आपली फेब्रुवारी, 2020 अंकाची कव्हर स्टार जाहीर केली आहे.