11 ऑक्टोबरपासून प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावहून तिरुपतीला जाण्यासाठी आणखी एक विमानफेरी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर या विमान कंपनीने बेळगाव- तिरुपती मार्गावर विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 ऑक्टेबरपासून आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी उपलब्ध होणार आहे. उडान- 3 अंतर्गत हा मार्ग स्टार एअरला मंजूर असल्याने प्रवाशांना तिकीट दरही कमी बसणार आहे.
यापूर्वी हैदराबाद येथील ट्रुजेट या कंपनीने तिरुपती-बेळगाव-तिरुपती ही विमानफेरी सुरू केली. बेळगाव, कोकण, गोवा येथे तिरुपती बालाजीचे अनेक भक्त असल्याने या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे थंडा प्रतिसाद मिळाला. त्यातच काही महिने मंदिर बंद असल्याने त्याचाही फटका या विमानफेरीला बसला होता. सध्या पर्यटकांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
स्टार एअरला बेळगाव-तिरुपती हा मार्ग उडान-3 अंतर्गत मंजूर झाला होता. कोरोनामुळे ही विमानफेरी सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. परंतु आता कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय स्टार एअरने घेतला आहे. कंपनीनेही तिकीट दर निश्चित केला असून बुकिंगही सुरू केले आहे.
अशी असणार विमानफेरी
आठवडय़ातून दोन दिवस बेळगाव-तिरुपती विमानफेरी असणार आहे. सोमवार व बुधवार अशी दोन दिवस विमानसेवा दिली जाणार आहे. सकाळी 11 वा. तिरुपती येथून निघालेले विमान दुपारी 12.55 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर दुपारी 1.20 वा. बेळगाव येथून निघालेले विमान 2.25 वा. तिरुपती येथे पोहोचणार आहे. 1 हजार 899 इतका प्राथमिक तिकीट दर कंपनीने निश्चित केला आहे.