वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टीनने जगातील सर्वोत्तम पाच फलंदाजांची निवड केली असून त्यामध्ये भारताचे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना स्थान दिले. या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटींग, विंडीजचा ख्रिस गेल आणि इंग्लंडचा केव्हिन पीटरसन यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, पाँटिंग, गेल आणि पीटरसन या दर्जेदार फलंदाजांसमोर स्टीनने गोलंदाजी केली आहे. वरील पाच सर्वोत्तम फलंदाज कोणत्याही गोलंदाजासमोर चिवट फलंदाजी करू शकतात. अलिकडच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा याची गोलंदाजीची पद्धत परिपूर्ण आणि सोपी वाटत असून चेंडू टाकताना त्याची गोलंदाजीची पद्धत कौस्तुकास्पद वाटते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज ठरू शकेल, असेही स्टीनने म्हटले आहे.
वेगवान गोलंदाज डेल स्टीनने दक्षिण आफ्रिकेकडून 93 कसोटी सामन्यांत 22.95 धावांच्या सरासरीने 439 बळीं मिळविले असून दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा स्टीन हा पहिला गोलंदाज आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये स्टीनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता.