पुरुषांच्या 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटमध्ये मोरोक्काच्या सौफियानेला सुवर्ण,
ऑलिम्पिक पुरुषांच्या 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटमध्ये केनियाची सलग 9 विजयांची परंपरा अखेर यंदा टोकियोत खंडित झाली. मोरोक्कोच्या सौफियाने अल बक्कालीने केनियाचे वर्चस्व मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. 25 वर्षीय सौफियानेने 8 मिनिटे 8.90 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करत अव्वलस्थान संपादन केले. तो यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी आला होता. शिवाय, 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदकापर्यंत मजल मारली होती.
इथिओपियाच्या लॅमेचा गिरमाने 8 मिनिटे 10.38 सेकंद वेळेसह रौप्य तर केनियाच्या बेंजामिन किगेनने 8 मिनिटे 11.45 सेकंद वेळेसह कांस्य पदक कमावले. 2016 ऑलिम्पिक चॅम्पियन कॉन्सेस्लस किप्रुतोला यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र देखील होता आले नाही. यामुळे, पूर्व आफ्रिकन देशाने 1984 नंतर सलग दहाव्यांदा ऑलिम्पिक स्टीपलचेस सुवर्ण जिंकण्याची आशा यापूर्वीच मावळली होती.
अल बक्कालीने अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने धावत पहिल्या टप्प्यापासून अखेरच्या टप्प्यापर्यंत आघाडी कायम राहील, याची काटेकोर काळजी घेतली. सातत्याने संततधार झाल्याने टोकियो ऑलिम्पिक स्टेडियमवर उष्ण तापमानाची समस्या मिटली, ही बाब त्याच्या पथ्यावर पडली.
शेवटचे 4 लॅप बाकी असताना मोरोक्कन ऍथलिट स्पर्धकांच्या मधल्या पॅकमध्ये होता. गिरमा व त्याचा राष्ट्रीय सहकारी गॅटनेट वेल आघाडीवर होते. अंतर कापले जात असताना इथिओपियाचे ऍथलिट आघाडी कायम राखून होते. मात्र, नंतर किगेन व त्याचा राष्ट्रीय सहकारी अब्राहम किबिवोत यांच्यात चुरस रंगली. एक लॅप बाकी असतानाही इथिओपियन्सच आघाडीवर होते. मात्र बक्कालीने तिसऱया स्थानापर्यंत झेप घेतली आणि फिनिशिंग लाईन जवळ येईल, त्याप्रमाणे त्याने आपला वेग अचानक वाढवत नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
विजयावर शिक्कामोर्तब होताच राष्ट्रीय ध्वज लपेटून घेत त्याने आपला आनंद साजरा केला. ‘मी नेहमी केनियन स्पर्धकांनाच जिंकताना पाहत आलो आहे. मागील अनेक वर्षांपासून माझे ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न होते. ते येथे साकारले गेले आहे’, असे बक्काली येथे म्हणाला.