पॅरिस : पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतच द्वितीय मानांकित स्टेफानोस सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आले. फॉर्ममध्ये असलेल्या फ्रान्सच्या युगो हम्बर्टने त्याला तीन सेट्सच्या मॅरेथॉन लढतीत पराभूत केले.
गेल्या महिन्यात अँटवर्प टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया हम्बर्टने सलग सात सामने जिंकले असून सित्सिपसविरुद्ध त्याने चार मॅचपॉईंट्स वाया घालविले. तरीही त्याने त्याच्यावर 7-6 (7-4), 6-7 (6-8), 7-6 (7-3) अशी मात करीत आगेकूच केली. जवळपास तीन तास चाललेल्या या लढतीत शेवटच्या सेटमध्ये टायब्रेकरवेळी हम्बर्टला झगडावे लागत असल्याचे दिसून आले. पण सित्सिपसनेही आपण पूर्ण फिट नसल्याचे नंतर सांगितले.
अन्य सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. वावरिंकाने एकमेव मास्टर्स स्पर्धा 2014 मध्ये जिंकली होती.
आणि गेल्या तीन वर्षात त्याला एकही एटीपी स्पर्धा जिंकता आलेली नाही. बेल्जियमच्या आठव्या मानांकित डेव्हिड गॉफिनला स्लोव्हाकियाच्या नॉर्बर्ट गॉम्बोसकडून 6-4, 7-6 (8-6) असा पराभवाचा धक्का बसला. इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीलाही अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनकडून 7-6 (7-3), 6-7 (0-7), 7-5 असे पराभूत व्हावे लागल्याने एटीपी टूर फायनल्समध्ये स्थान मिळविण्याच्या त्याच्या आशाही संपुष्टात आल्या. पाब्लो बुस्टाने जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफवर 7-6 (7-3), 6-2 अशी मात केली तर मिलोस रेऑनिकने दुसरी फेरी गाठताना ऍलाझ बेडेनेचा 6-3, 6-2 असा पराभव केला. फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटनेही टेलर फ्रिट्झचा तीन सेट्समध्ये पराभव करून आगेकूच केली आहे.